मीडिया
इलेक्ट्रॉनिक मीडिया
प्रिंट मीडिया
जीवेत शरद: शतम्
दिव्य लोकप्रभा विशेषांक








अपडेट
पत्रकारांना सुद्धा आता मतांची ताकद दाखवावी लागेल - वसंत मुंडे
जळगाव मध्ये साधला पत्रकारांशी संवाद
जळगाव – प्रतिनिधी
पत्रकारांचे संरक्षण आणि लोकशाहीचे रक्षण याचा जागर करत नागपूर येथील दीक्षाभूमीतून पत्रकार संवाद यात्रेला प्रारंभ झाला असून 20 ऑगस्ट रोजी मुंबईत मंत्रालया समोर यशवंतराव चव्हाण सभागृहात याचा समारोप होणार आहे. लोकशाहीच्या माध्यमातून आतापर्यंत सरकारला पत्रकारांचे प्रश्न असतात आणि ते सोडवावे लागतात यासाठी न्याय पद्धतीने मागण्या मांडल्या आहेत. मात्र सरकार अजूनही दखल घ्यायला तयार नसल्यामुळे राज्यात
संवाद यात्रा काढावी लागली आहे. समाजाचे प्रश्न सोडवणे हे पत्रकारांचे कामच आहे. परंतु पत्रकारांचे सुद्धा प्रश्न असतात आणि ते सोडवावे लागतात हे जर सरकारला कळत नसेल तर हे प्रश्न सोडवण्यासाठी आता पत्रकारांना सुद्धा आपल्या मतांची ताकद दाखवावी लागेल अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
जळगाव येथील नवी पेठ, स्टेशन रोड वरील हॉटेल सिल्वर पॅलेसच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकार संवाद यात्रे संदर्भात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, इलेक्ट्रॉनिक मीडिया उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी, जळगाव जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, नंदुरबार जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे,मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. पत्रकार परिषदेला संबोधित करताना पुढे यात्रेचे प्रमुख तथा प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले की, संवादामध्ये परिवर्तनाची ताकद आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुक्यातून संवाद साधत त्या त्या जिल्ह्यातील तालुक्यातील समस्यांना सरकार पुढे ठेवण्यासाठी ही संवाद यात्रा काढली आहे. महाराष्ट्रातील ही पहिली संवाद यात्रा आपल्या पाठबळावर ती ऐतिहासिक ठरत आहे. कोरोना काळापासून माध्यमावर मोठे संकट ओढवले आहे. कोरोना काळात शासकीय कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांना सरकारने घोषणा केल्याप्रमाणे आरोग्य कवच दिले गेले. परंतु लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातील पत्रकारांना घोषणा करून ही आरोग्य कवच दिले गेले नाही, ही मोठी खंत आहे. लोकशाहीतील चार स्तंभापैकी शासन, प्रशासन आणि न्यायव्यवस्था या तीन खांबांना बळकटी दिली जाते. मात्र दुर्दैवाने लोकशाहीला जिवंत ठेवणाऱ्या चौथा स्तंभाला म्हणजेच माध्यमांना सरकार कोणतीही सुविधा देत नाही हेच दुर्भाग्य आहे. यासाठी सरकारला जागे करणे आणि आपल्या मूलभूत प्रश्नांना न्याय हक्काने सोडून घेण्यासाठी पत्रकारांनी एकजुटीने आता एकत्रित येऊन न्याय मागितला पाहिजे. जर लोकशाही टिकवायची असेल तर या चौथ्या स्तंभाला सक्षम करावे लागेल. शासनाला संवेदनशील होऊन पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय द्यावाच लागेल.
पत्रकार हा सर्व तळागाळापर्यंत जाणारा एकमेव घटक आहे. त्याचे महत्त्व आणि ताकद प्रचंड आहे. ती सरकारने ओळखावी अन्यथा पत्रकारांनी आता आपल्या लेखणी बरोबर आपल्या मतांची ताकद सुद्धा दाखवून सरकारला जागे करावे लागेल यासाठीच हा लढा सुरू आहे माध्यम जर कमजोर झाली तर सामान्यांचा आवाज कमजोर होईल लोकशाही संकटात सापडेल.लोकशाही ही व्यवस्था सक्षम राहण्यासाठी आता आपणच पत्रकारांनी जागृत होणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.यात्रेच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नावर राज्यभर जागर सुरू केला आहे.आता हा जागर प्रश्नांना न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील. दि 20 ऑगस्ट रोजी मुंबईतील मंत्रालयावर पत्रकारांचा हा जागर एकजुटीच्या रूपाने सरकारला दिसेल.यासाठी पत्रकारांनी आपले विराट एकजुटीचे दर्शन तमाम पत्रकारांनी मुंबईत उपस्थित राहून दाखवावे.विशेषतः जळगाव येथील पत्रकारांनी सर्वाधिक संख्येने मुंबई येथील पत्रकार संवाद यात्रेच्या समारोपाला उपस्थित राहून सरकारला जागे करण्यासाठी एक कर्तव्य म्हणून सहभागी व्हावे असे आवाहन याप्रसंगी केले.या संवाद यात्रेमागे कोणतेही राजकारण नाही. आमचे प्रश्न सुटावेत एवढीच आमची प्रामाणिक भूमिका असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेमध्ये टीव्ही 9 चे प्रतिनिधी किशोर पाटील यांनी पत्रकारांच्या वास्तव वेदना सांगणारी ज्वलंत कविता आपल्या अप्रतिम शब्दातून व्यक्त केली.या पत्रकार परिषदेला पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती हीच एकजुटीची ताकद व्यक्त करत होती.
लोकशाहीचा डीएनए पत्रकार: वसंत मुंडे
विदर्भात सर्व स्तरातील लोकांचा संवाद यात्रेला प्रतिसाद आणि पाठिंबा
अकोला, प्रतिनिधी :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहिली. घटनेतच त्यांनी पत्रकार आणि माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे ठणकावून सांगितले. कारण महामानव बाबासाहेब हे घटना लिहिण्यापूर्वी पत्रकार होते. त्यांनी बहिष्कृत भारत नावाचे वर्तमानपत्र काढले. यामुळे पत्रकार हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा डीएनए आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले. ते अकोला येथे मंगळवारी (दी.30) पत्रकार परिषदेत बोलत होते.
दीक्षाभूमीवरून निघालेली पत्रकार संवाद रॅली सेवाग्राम (वर्धा), अमरावती मार्गे मंगळवारी (दी.30) दुपारी 12 वाजता अकोला येथे पोहोचली. येथील विश्रामगृहावर प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पत्रकारांना संबोधित करताना वसंत मुंडे म्हणाले, कोरोना महामारीनंतर पत्रकारांची अवस्था ना घर का ना घाट का… अशी झाली आहे. वर्तमानपत्रांचा खप प्रचंड कमी झाल्याने दैनिकांचे मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आर्थिक गणित जुळत नसल्याने अनेक वर्तमानपत्रांनी विभागीय आवृत्या बंद केल्या. पत्रकारांसह कर्मचारी असलेल्या मीडिया कर्मींची संख्या कमी केली. यामुळे कोरोना महामारीनंतर हजारो पत्रकारांच्या नोकऱ्या जाऊन ते विस्थापित बनले आहेत. जे सक्रिय आहेत त्यांचे पगार कमी झाले आहेत. या साऱ्या परिस्थितीत वर्षानुवर्षापासून लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांचे स्वतःचे प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु लोकांचा आवाज बनवून त्यांचे प्रश्न चव्हाट्यावर आणण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांना दुर्दैवाने स्वतःचे प्रश्न मांडता येत नाहीत. मांडले तरी राज्यकर्ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. कारण महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांच्या प्रश्नावर शासन दरबारी आवाज उठवून पाठपुरावा करत आहे. काही प्रश्न सोडवण्यात पत्रकार संघाला यश आले असले तरी महत्वाचे प्रश्न सुटलेले नाहीत, असे मुंडे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, अलीकडच्या काळात सरकार खूप उदार झालेले आहे. लाडकी बहीण पासून विद्यार्थ्यांपर्यंत समाजातील विविध घटकांसाठी काही लाख कोटींच्या योजना सरकारने जाहीर केल्या आहेत. परंतु पत्रकारांसाठी कोणतीच योजना नाही. त्याला घरकुल मिळत नाही. बँकांचे कर्ज देखील मिळत नाही. आधी स्वीकृती दिली जाते, परंतु पत्रकारांची संख्या हजार असेल तर केवळ दहा- वीस जणांना अधिस्वीकृती मिळते. कारण अधिस्वीकृती मिळवण्याचे नियम आणि अटी खूपच जाचक आहेत. खरी अधिस्वीकृतीची गरज असलेले ग्रामीण भागातील पत्रकार त्या अटी- शर्तींची पूर्तता करू शकत नाहीत. यासाठी सरकारने अटी आणि नियम शिथिल करावेत, वर्तमानपत्रांचा खप वाढवा, पत्रकार व वर्तमानपत्रांचे मालक यांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी नियमित वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्या वाचकांना 5 हजार रुपयांची आयकरात सवलत द्यावी, गाव तेथे ग्रंथालय या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतच्या वार्षिक आराखड्यात वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी दहा हजार रुपयांचा निधी राखीव ठेवावा. बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचे पेंडिंग ठेवलेले प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत. जेणेकरून वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ पत्रकारांचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल. यासह पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने महामानव बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी पत्रकार संवाद रॅली काढली आहे. संवाद रॅलीला पत्रकार आणि समाजातील सर्व स्तरातल्या घटकांचा भरभरून असा पाठिंबा व प्रतिसाद मिळत असल्याचे वसंत मुंडे म्हणाले.
यावेळी सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रवीण सपकाळे, राज्य समन्वयक संतोष मानुरकर यांच्यासह अकोला जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुसे, देवानंद गहिले, सम्राट वानखेडे, नागेश भालतिलक, रामजी श्रीवास, अजय सोळंके, जगन्नाथ कोल्हे, लक्ष्मण सपकाळ, सय्यद हसन बाबू यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध स्तरातून पाठिंब्याचे पत्र
दीक्षाभूमी येथून निघालेली पत्रकार संवाद रॅली विदर्भातील विविध जिल्ह्यातून जात आहे. यावेळी पत्रकार रोज आमचे प्रश्न मांडतात. मग ते आज अडचणीत असतील तर आम्हीही त्यांच्या सोबत आहोत, असे म्हणत विविध सामाजिक संघटना, प्रतिष्ठाने संवाद रॅलीला पाठिंब्याचे पत्र देत आहेत. अकोला येथे अंकुर साहित्य संघाच्या वतीने अध्यक्ष हेमंत ढाळे व विष्णू रामचंद्र जोध यांनी जाहीर पाठिंबा दिला. तसेच पुरोगामी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अब्दुल साबीर, बिस्मिल्ला शाह तसेच अकोला येथील शेतकरी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला. यावेळी शेतकरी संघटनेचे साहेबराव लांडे, गजानन पालखडे, सुनील खवले उपस्थित होते
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी वर्तमानपत्रांना बळ मिळणे गरजेचे आहे-वसंत मुंडे
अमरावती येथे पत्रकार संवाद रॅलीचे जागोजाग स्वागत
अमरावती, प्रतिनिधी : – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची संवाद रॅली सोमवारी (दी.29) दुपारी अमरावती येथे पोहोचली. सेवाग्राम (वर्धा) ते अमरावती दरम्यान रॅलीचे स्थानिक पत्रकारांनी जागोजाग जंगी स्वागत केले. दरम्यान अमरावती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी वर्तमानपत्रांना बळ मिळणे गरजेचे आहे. कारण कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका वर्तमानपत्रांना बसला आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेली वर्तमानपत्रे कमकुवत बनत असल्याने पत्रकारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या साऱ्या परिस्थितीत लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठी वर्तमानपत्रांना बळ मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची संवाद यात्रा रविवारी (दी.28) दीक्षाभूमी येथून सेवाग्रामच्या दिशेने परवाना झाली. सेवाग्राम येथे संवाद रॅलीत सहभागी झालेल्या राज्यभरातील पत्रकारांचे स्थानिक पत्रकारांनी उत्स्फूर्त स्वागत केले. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सेवाग्राम येथेही रॅलीचे स्वागत झाले. दरम्यान, सोमवारी (दी.29) सेवाग्राम येथून पत्रकार संवाद रॅली अमरावतीच्या दिशेने निघाली. वाटेत चांदुर रेल्वे येथे रॅलीचे फटाके फोडून स्वागत झाले. यानंतर बुद्ध टेकडी येथे सकाळपासून प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक पत्रकारांनी प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे व पदाधिकाऱ्यांचे स्वागत आणि सत्कार केला. या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यानंतर अमरावती येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पत्रकारांना संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले, कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका जर कोणाला बसला असेल तर तो वर्तमानपत्र आणि पत्रकारांना बसला आहे. अनेक वर्तमानपत्रांच्या आवरत्या बंद झाल्या. हजारो पत्रकारांची नोकरी गेली. कोरोना महामारी पत्रकार फ्रंट लाईनला असलेल्या पोलिस वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने काम करत होते. शासनाने कर्मचाऱ्यांसाठी 50 लाखाचे विभाग कवच दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकारांनाही विमा सुरक्षा देण्याची मागणी केली. सदरील मागणी मान्य ही झाली. परंतु पुढे काय झाले माहित नाही. दीडशेहून अधिक पत्रकारांचा फ्रंट लाईनला काम करत असताना मृत्यू झाला. यापैकी एकाही पत्रकाराला विमा मिळाला नाही. या साऱ्या परिस्थितीत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेली लहान- मोठी सर्वच वर्तमानपत्रे सक्षम झाली पाहिजेत. वर्तमानपत्रे सक्षम झाली तर लोकशाहीचे देखील बळकटीकरण होणार आहे. वर्तमानपत्र आणि पत्रकारांना सक्षम म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत आणि खंबीर बनवण्यासाठीच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने संवाद रॅली काढली असल्याचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले.
यावेळी सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रवीण सपकाळे, राज्य समन्वयक संतोष मानुरकर, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी तसेच स्थानिकचे पत्रकार प्रवीण शेगोकार, नयन मोंढे, अजय शृंगारे, अर्चना रक्षे, अनिरुद्ध उगले, अमित अग्रवाल, शेषनाग गजभिये, पुष्पा जैन, अली असगर दवावाला, गजानन खोपे, राजा वानखेडे, मनीष भंकाळे, मनीष गुडदे यांच्यासह स्थानिक पत्रकार उपस्थित होते.
अधिस्वीकृतीच्या अटी शिथिल करा
पत्रकार परिषदेत बोलताना वसंत मुंडे म्हणाले, अधिकृती समितीचा विभागीय अध्यक्ष असताना मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेतल्या. शहरी तसेच ग्रामीण भागातील अनेक पत्रकारांना अधिक स्वीकृती मिळवून दिली. परंतु आधी स्वीकृतीची खरी गरज ग्रामीण भागातील पत्रकारांना आहे. प्रत्येक पत्रकाराला अधिस्वीकृती मिळावी यासाठी शासनाने नियम आणि अटी येथील कराव्यात, असे वसंत मुंडे म्हणाले.
वर्तमानपत्र वाचकांना आयकरात सूट द्या
कोरोना महामारीनंतर सर्वच वर्तमानपत्रांचा खूप कमी झाला आहे. याचा फटका वर्तमानपत्र आणि त्यामध्ये काम करणारे पत्रकार व माध्यमकर्मी यांना बसला आहे. या परिस्थितीत वर्तमानपत्र आणि पर्यायाने पत्रकारांना सक्षम करण्यासाठी वृत्तपत्र खरेदी करणाऱ्यांना प्रतिवर्षी पाच हजार रुपयांची सूट द्यावी. तसेच ग्रामीण भागातील वाचकांना आपल्या गावात पेपर वाचायला मिळावा यासाठी ग्रामपंचायतीनी वार्षिक आराखड्यात वर्तमानपत्र खरेदीसाठी दहा हजार रुपयांचा निधी राखीव ठेवावा. असे केले तरच पत्रकार सक्षम बनतील, असे वसंत मुंडे म्हणाले.
मताचे गठ्ठे पाहूनच न्याय मिळत असेल तर प्रत्येक पत्रकार एक गठ्ठा आहे: वसंत मुंडे
दीक्षाभूमी येथून उस्फुर्त प्रतिसादात पत्रकार संवाद यात्रेला सुरुवात
नागपूर, प्रतिनिधी :- दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेला रविवारी (दि. 28) दीक्षाभूमी येथून राज्यभरातील पत्रकारांच्या प्रचंड प्रतिसादात सुरुवात झाली. यावेळी उपस्थित शेकडो पत्रकारांना मार्गदर्शन करताना, वसंत मुंडे म्हणाले, राज्यकर्ते मताचे गठ्ठे पाहूनच समाजातील विविध घटकांसाठी योजना जाहीर करत असतील तर या राज्यातला प्रत्येक पत्रकार मताचा गठ्ठा आहे. याचा विचार करून राज्यकर्त्यांनी पत्रकारांचे प्रश्न सोडवावेत असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, मंत्रालय विधिमंडळ वार्ताहार संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर संवाद यात्रेला सुरुवात झाली.
नागपूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखालील बहुचर्चित राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रेला रविवारी (दि.२८ जुलै २०२४) सुरूवात झाली. लोकशाहीच्या बळकटीसाठी, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी, हा संकल्प घेवून दीक्षाभूमी ते मंत्रालय या पत्रकार संवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वासराव आरोटे, मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, माजी अध्यक्ष चंदन शिरवाळे,कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, , राज्य समन्वयक संतोष मानुरकर, निलेश सोमाणी, महेश पाणसे, नितीन शिंदे,नयन मोढें, वैभव स्वामी यांच्यासह राज्यभरातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. यावेळी पुढे बोलताना वसंत मुंडे म्हणाले, घटना लिहिण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पत्रकार होते. बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र त्यांनी काढले. यामुळे महामानव बाबासाहेबांनी जिथे दीक्षा घेतली, त्या दीक्षा भूमीतूनच पत्रकार संवाद यात्रा काढायची असे ठरवले होते. महामानव बाबासाहेबांच्या पावन अशा दीक्षाभूमीला वंदन करून पत्रकार संवाद यात्रा पुढे जाणार आहे. आजपर्यंत पत्रकार सर्वसामान्य माणसाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, प्रशासकीय, राजकीय प्रश्न शासन आणि प्रशासनाच्या दरबारात मांडत आले आहेत. सर्वसामान्य माणसाचा आवाज बनत आले आहेत. कायम लोकांचा आवाज बनत आलेल्या पत्रकारांवर आज स्वतःसाठी आवाज उठवण्याची वेळ आली आहे. कारण कोरोना महामारीनंतर पत्रकार ज्या आवस्थेतून जात आहेत. जे प्रश्न आणि संकटांचा सामना करत आहेत, त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. पत्रकार हा समाजाचा एक घटक आहे, हे मानायला देखील राज्यकर्ते आणि प्रशासन तयार नाही. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी शासनाच्या काही ना काही योजना आहेत. परंतु पत्रकारांसाठी कोणत्याच योजना नाहीत. पत्रकार समाजातला एक घटक असेल तर त्याच्यासाठी शासनाच्या योजना का नाहीत? हे विचारण्यासाठी ही पत्रकार संवाद रॅली आहे. सरकार विविध घटकांचे मतांचे गठ्ठे पाहून त्यांच्यासाठी विविध योजना जाहीर करत असेल तर सरकारने पत्रकारांचा मतांचा गठ्ठा किती मोठा आहे, हे देखील लक्षात घ्यावे, असे सांगत संवाद यात्रा जसजशी पुढे जाईल तसे लोकांचे मोठ्या प्रमाणात समर्थ मिळेल आणि राज्य सरकार पत्रकारांच्या प्रश्नाबाबत गंभीर बनेल, असा विश्वास वसंत मुंडे यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना त्यांनी ही संवाद यात्रा पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते, मालक, वर्तमान पत्रातील इतर कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी असल्याचे शेवटी वसंत मुंडे म्हणाले. संवाद यात्रेत सर्व स्तरातील पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, विश्वासराव आरोटे म्हणाले, पत्रकार संवाद यात्रेची संकल्पना प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांची होतीच, परंतु त्यांच्यात नेतृत्व आणि दातृत्व देखील आहे. संवाद यात्रा काढताना संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांला वसंतराव यांनी विश्वासात घेतले. यामुळेच आज संवाद यात्रेच्या शुभारंभाला राज्यभरातील सर्व स्तरातील पत्रकारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे विश्वासराव आरोटे म्हणाले. तर संपादक संतोष मानुरकर म्हणाले, आजचा पत्रकार संवाद यात्रेचा शुभारंभ झालेला 28 जूलै हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवला जाणार आहे. ही यात्रा जेंव्हा मुंबई आणि मंत्रालयात जाईल तेंव्हा वसंतराव मुंडे हे राज्यभरातील पत्रकारांसाठी गोड बातमी देतील, असे मानुरकर म्हणाले.
प्रास्ताविकात विभागीय अध्यक्ष प्रमोद शेंडे यांनी संवाद यात्रा मंत्रालयावर धडकल्यानंतर आपले प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे हे नक्कीच पत्रकारांसाठी काही ना काही घेवून येतील असा विश्वास व्यक्त केला. दीक्षाभूमी येथील पत्रकार संवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी राज्यभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संवाद यात्रेत राज्यभरातील पत्रकारांच्या गाड्यांचा ताफा
पत्रकार आणि सर्व स्तरातील माध्यम कर्मी यांचे प्रश्न घेऊन दीक्षाभूमी येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या संवाद रॅलीचा मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे चंदन शिरवाडे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. संवाद यात्रेचा पहिला मुक्काम महात्मा गांधींची पावन भूमी वर्धा येथे आहे. सेवाग्रामकडे पत्रकार संवाद रॅली जात असताना राज्यभरातील शेकडो पत्रकार आपल्या वाहनांसह रॅलीत सहभागी झाल्याने रॅलीतील वाहनांची रांग अर्धा ते एक किलोमीटर एवढी झाली होती. पत्रकार रॅलीचा हा ताफा आणि त्यांची एकजूट राज्यकर्त्यांना नक्कीच विचार करायला भाग पाडणार पाडणार असल्याचा विश्वास यावेळी पत्रकार बांधव व्यक्त करत होते.
50 संघटनांचा पाठिंबा
दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगीच राज्यभरातील वेगवेगळ्या सामाजिक आणि विचाराच्या संघटनांनी पत्रकार संवाद यात्रेला पाठिंबा दिला. विशेष म्हणजे राज्यातील अनेक आजी माझी लोकप्रतिनिधींनी पत्रकारांच्या प्रश्नाबाबत संवेदना दाखवत पत्रकारांच्या सोबत असल्याचे सांगितले
लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पत्रकार संवाद यात्रेचे पोस्टरचे अनावर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले….
राज्यातील पत्रकारांच्या एकीच्या शक्तीचे दर्शन सरकारला घडेल - वसंत मुंडे
दिक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेला 28 जुलैपासून प्रारंभ
बीड (प्रतिनिधी) केंद्र आणि राज्य सरकारची एकूण धोरणे लक्षात घेता जिल्हा, तालुका, गाव पातळीवरील छोटी वृत्तपत्रे आणि पत्रकार ही व्यवस्था कमजोर करण्याचीच राहिली आहेत. समाजातील विविध व्यावसायीक, नोकरदार, तरूण, महिला या घटकांना न्याय देताना पत्रकारांच्या मागण्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. सरकार मतपेढीचा विचार करून हजारो कोटींच्या घोषणा करते. मात्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार्या पत्रकारांचेच प्रश्न पाठपुरावा करूनही सुटत नाहीत. पत्रकारही समाजातील प्रमुख घटक आहेत. याची आठवण करून देण्यासाठी संवाद यात्रा होणार आहे. संवाद ही नैसर्गिक प्रक्रिया असून ती थेट वैयक्तीक आणि संस्थात्मक परिवर्तन घडवते. यात्रा पत्रकारांचे प्रश्न सरकारला सांगण्यासाठी आणि पत्रकारांना समजुन घेण्यासाठी संधी प्रदान करणार आहे. रविवार दि.28 जुलै रोजी नागपूरच्या दिक्षाभूमीतून यात्रेचा शुभारंभ होणार असुन यात्रेचा समारोप मुंबई मंत्रालय येथे होणार आहे असे पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बीड येथील हॉटेल निलकमल येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी, लोकशाहीच्या बळकटीसाटी काढण्यात येणार्या दिक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा संदर्भात पत्रकार परिषद घेवून सविस्तर माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ संपादक राजेंद्र आगवान,ज्येष्ठ संपादक सुनील क्षीरसागर,पत्रकार संघाचे मार्गदर्शक संतोष मानूरकर, संपादक संघाचे अध्यक्ष नरेंद्र कांकरिया,ज्येष्ठ पत्रकार महेश वाघमारे,ज्येष्ठ फोटोग्राफर विश्वनाथ माणूसमारे, लोकपत्रकार भागवत तावरे, संजय मालानी, बालाजी मारगुडे, दिनेश लिंबेकर,शेखर कुमार,वैभव स्वामी यांची प्रमुख उपस्थिती व्यासपीठावर होती. यावेळी पत्रकार संवाद यात्रे संदर्भात अधिक माहिती देताना पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले की, भारतीय लोकशाहीत वृत्तपत्र, पत्रकार आणि प्रसारमाध्यमात काम करणारे प्रतिनिधी हा चौथा स्तंभ मानला जातो. पण समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव आणि केंद्र व राज्य सरकारची एकूण धोरणे लक्षात घेता जिल्हा, तालुका, गाव पातळीवरील प्रसारमाध्यम व्यवस्था कमजोर करण्याचेच प्रयत्न होत आहेत. वैयक्तीक संघटनेच्या माध्यमातून माध्यम क्षेत्रातील निर्माण झालेले प्रश्न सातत्याने सरकारी व्यवस्थेसमोर मांडून पाठपुरावा केल्यानंतरही या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली जाते. कोरोना महामारीनंतर वृत्तपत्र व्यवसाय अडचणीत आला आहे. सरकारने अनेक क्षेत्रांना मदत केली पण वृत्तपत्र क्षेत्राला मदत केली नाही. कोरोनात दिडशेपेक्षा अधिक पत्रकारांचा मृत्यू झाला. घोषणा करूनही सरकारने मदत केली नाही. जाहिरातीवरील करापासून ते छपाईच्या कागदापर्यंत आणि पत्रकारांच्या अधिस्विकृतीपासून ते पेन्शन योजनेपर्यंत सातत्याने निवेदने, पाठपुरावा केल्यानंतरही शासन गांभिर्याने विषय समजून घेत नाही. मात्र मतपेटीचा विचार करून विविध घटकांना हजारो कोटी रूपयांच्या योजना दिल्या जातात. या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार्या घटकाला मात्र वंचित ठेवले जात आहे. पत्रकारही प्रमुख घटक आहे, तो ही मतदार आहे याची आठवण करून देण्यासाठी आणि शांततेच्या संवाद मार्गाने सरकारला पत्रकारांचे प्रश्न सांगण्यासाठी ही यात्रा आहे. राजकीय व्यवस्थेवर अंकुश आणि समाजाचे प्रश्न मांडणार्या घटकाला आपले प्रश्न मांडण्यासाठी यात्रा काढावी लागत आहे हे दुर्देव. लोकशाहीत स्थानिक पातळीवरील पत्रकार ही व्यवस्था सक्षम राहिली तरच सामान्य माणसाचा आवाज बुलंद राहिल आणि व्यवस्थेवर अंकुश राखता येईल. यासाठी समाजातील विविध घटकांनीही पत्रकारांच्या मागण्यांसाठी पाठींबा द्यावा ही अपेक्षा आहे. दि.28 जुलै 2024 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिक्षाभूमी नागपूर येथून यात्रेचा शुभारंभ होईल. नागपूर, खान्देश आणि उत्तर महाराष्ट्र या तीन विभागातील जिल्हे आणि तालुक्यातून ही यात्रा शिर्डी येथे 3 ऑगस्ट रोजी येणार आहे. यात्रे दरम्यान प्रत्येक जिल्हा, तालुक्याच्या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधून त्या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, साहित्यीक यांचा पाठींबा घेण्याचा प्रयत्न होणार आहे. दुसर्या टप्यात छत्रपती संभाजीनगर येथून यात्रेला सुरूवात होवून बीड, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, सातारा, बारामती, पुणे या मार्गे दि.20 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंट्रलमध्ये यात्रेचा समारोप होईल. यात्रेत हजारोंच्या संख्येने पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते आणि पत्रकारप्रेमी संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. सरकाने पत्रकारांचा विषय गांभिर्याने घेवून चर्चा करून न्याय देण्याची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा आहे. यासाठी पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच निघणार्या या संवाद यात्रेत सर्वांनी सहभागी होवून आपल्या एकीच्या शक्तीचे दर्शन सरकारला द्यावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केले.
मान्यवरांच्या हस्ते पोस्टर प्रकाशन
पत्रकारांच्या विविध न्याय मागण्यांसाठी सर्व पत्रकारांना सोबत घेवून विविध राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील विचारवंत, नामवंत यांचा पाठींबा घेत नागपूर दिक्षाभूमी ते मंत्रालय मुंबई अशी पत्रकार संवाद यात्रा राज्याच्याच नव्हे तर कदाचित देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच निघणार असल्याने इतिहास घडणार आहे. यावेळी यात्रा पोस्टरचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कै.पत्रकार सुधाकर सोनवणे यांच्या कुटुंबियांना केली आर्थिक मदत
परखड आणि सडेतोड लिखाण करणारे पत्रकार सुधाकर सोनवणे यांचे कर्करोगाने अल्पवयात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर दोन लहान मुले, पत्नी यांच्यापुढे जगावे कसे? असा मोठा प्रश्न आर्थिक अडचणीमुळे निर्माण झालेला आहे. या कुटुंबीयांना आधार म्हणून पत्रकार संघाच्या वतीने रोख दहा हजार रुपयाची मदत यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर सोनवणे यांच्या कुटुंबीयांना दानशूरांनी पुढे येऊन मदत करावी असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे. दानशूरांनी सोनवणे कुटुंबीयांना मदत करण्यासाठी मयत सुधाकर सोनवणे यांच्या धर्मपत्नी तत्त्वशीला सुधाकर सोनवणे यांच्या 9561259267 या नंबरवर संपर्क साधावा.
लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जात असलेल्या प्रसार माध्यम क्षेत्रातील प्रश्नावर जनजागृती व्हावी यासाठी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संवाद यात्रा होणार आहे. संवाद ही शांततेच्या मार्गाने प्रामाणिक,सुरक्षीत चर्चा आहे.ज्यामुळे लोकांच्या समस्या मांडणाऱ्या,पत्रकारांचे प्रश्न सरकारला सांगण्याची व पत्रकारांच्या वेदना, समजून घेण्याची संधी प्रदान करणार आहे. ”संवाद ही एक मूलभूत प्रक्रिया आहे. जी थेट वैयक्तिक आणि संस्थात्मक बदल घडवून आणते.पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकार संवाद यात्रा निघत आहे. लोकशाहीत माध्यम व्यवस्था सक्षम राहिली तर सामान्य माणसाचा आवाज बुलंद राहील यासाठी समाजातील प्रत्येकाने या संवाद यात्रेत सहभागी व्हावे. आणि ऐतिहासिक क्षणाचे नुसतेचं साक्षीदार न होता भागीदार व्हावे ही विनंती.
विश्वासराव आरोटे
राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई
पत्रकार संवाद यात्रा ही एक सुरक्षित आणि प्रामाणिक चर्चा आहे ज्याचा उद्देश फक्त राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सरकारला सांगण्याची व पत्रकारांना ऐकण्याची आणि समजून घेण्याची संधी प्रदान करणार आहे. ”संवाद ही एक मूलभूत संप्रेषण प्रक्रिया आहे जी थेट वैयक्तिक आणि संस्थात्मक बदल घडवून आणते.पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व लोकशाहीचा बळकटीसाठी पत्रकार संवाद यात्रा निघत आहे. त्यामुळं प्रत्येकाने ताकदीने सहभागी होऊन यात्रा यशस्वी करून या ऐतिहासिक क्षणाचे नुसतेचं साक्षीदार न होता भागीदार व्हावे हीच विनंती.
प्रवीण सपकाळे,
यात्रा संयोजक,राज्य कार्यध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबा देशमाने यांनी दिल्लीत नुतन क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांची मंत्रालयात भेट घेऊन वृत्तपत्राच्या अर्थकारणावरील पुस्तिका देऊन चर्चा केली.तर माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचीही भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करण्यांना उत्पन्न घरात वार्षिक पाच रुपये सूट द्यावी या मागणीबाबत चर्चा केली. सोबत पत्रकार संघाचे भगीरथ तोडकरी.
पुर्वीचा काळ कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याचा होता-भास्कर मुंडे
माजी विभागीय आयुक्त यांची सदिच्छा भेट
बीड (प्रतिनिधी) मराठवाडा विभागाचे सेवानिवृत्त विभागीय आयुक्त भास्कर मुंडे यांनी बुधवारी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. पत्रकार संघाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले तर सनदी अधिकारी म्हणून ३२ वर्षापेक्षा अधिक काळ काम करताना आलेल्या अनेक अनुभव सांगताना प्रशासनात पुर्वीचा काळ कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याचा होता, आज त्याची वानवा दिसते असे स्पष्ट मत व्यक्त केले.
बीड येथे खाजगी कामानिमित्त आलेले सेवानिवृत्त मराठवाडा विभागाचे महसूल विभागीय आयुक्त भास्कर मुंडे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांचे वसंत मुंडे यांनी स्वागत केले. यावेळी पत्रकार संघाच्या माध्यमातून लोकसभा निवडणूकीत वर्तमानपत्रांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शंभर उमेदवारांना दिलेल्या निवेदनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तर ३२ वर्षापेक्षा अधिक काळ प्रशासकीय सेवेत काम करताना विविध माध्यमातील पत्रकारांनी मोलाचे सहकार्य केल्याची कृतज्ञ भावना व्यक्त केली. प्रशासकीय सेवेत लोकांना मदत करताना अनेक अनुभव येतात. अलीकडे मात्र प्रशासकीय यंत्रणेत आलेल्या लोकांबद्दल सर्वसामान्य माणसात नकारात्मकता दिसून येते. याला प्रशासकीय यंत्रणेतील लोकांचे वर्तन जबाबदार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पुर्वीचा काळ कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याचा होता, आता त्याची वनवा दिसत आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.
वृत्तपत्र खरेदी करणार्यांना आयकरात सुट मिळावी याबाबत विचार करू-नितीन गडकरी
पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे यांच्या शिष्टमंडळाला ग्वाही
नागपूर (प्रतिनिधी) लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहूमत मिळणार असून सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केलेली वृत्तपत्र खरेदी करणार्यांना वार्षिक पाच हजार रूपयाची उत्पन्न करात सुट द्यावी ही मागणी आपण संसदेच्या सभागृहात मांडू आणि सकारात्मक निर्णय होईल अशी ग्वाही नागपूर लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाला दिली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना वृत्तपत्र आणि पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नागपूर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप शेंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून पत्रकार संघाचे निवेदन आणि माहितीपुस्तिका देवून चर्चा केली. यावेळी नितीन गडकरी म्हणाले, ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न, वर्तमानपत्रांच्या समस्या आपल्याला माहित आहेत. भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन होणार आहे. त्यानंतर संसदेच्या सभागृहात वृत्तपत्रांच्या मागणीसंदर्भात आपण पुढाकार घेवू राज्य पत्रकार संघाने वृत्तपत्र खरेदी करणार्यांना उत्पन्न करात वार्षिक पाच हजाराची सुट द्यावी ही मागणी वृत्तपत्र व्यवसायाला बुस्टर डोस ठरणार आहे. प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने नागपूर विभागातील विविध पक्षाच्या उमेदवारांना निवेदन देवून पत्रकारांच्या प्रश्नाकडे प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे यांच्यासह सरचिटणीस अंकुश डाखोरे, संघटक मोहम्मद इलियास व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बीड जिल्ह्याचे सुपुत्र,मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार श्री चंदन शिरवाळे यांना दैनिक पुढारी वृत्तसमुहाने सहाय्यक संपादक (राजकीय) पदावर बढती दिली आहे.याबद्ल बीड येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी त्यांच्या सत्कार करून शुभेच्छा दिल्या.यावेळी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, सेवानिवृत्त अधिकारी अशोक जावळे उपस्थित होते.
पत्रकार संघाची मागणी लोकसभेत लावून धरू -निलेश लंके
सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या शिष्टमंडळाला ग्वाही.
अहमदनगर (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील पत्रकारांची प्रश्न आपणाला माहित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने निवेदनात केलेली मागणी आपण संसदेच्या सभागृहात लावून घेऊ अशी ग्वाही अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी दिली तर लोकसभा निवडणुकीवर निकालानंतर इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असून आपलाही विजय पक्का आहे असा दावाही त्यांनी केला.महाराष्ट्राचे पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांचे नेतृत्वाखाली पत्रकारांच्या शिष्टमंडळाने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्र पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची भेट घेऊन केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणाऱ्यांना वार्षिक काय करात पाच हजार रुपये सूट द्यावी या मागणीचे निवेदन दिले. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात विविध पक्षाच्या उमेदवारांना पत्रकारांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी निवेदन देण्याची मोहीम राबवण्यात आली याच मोहिमे अंतर्गत पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी पत्रकार संघाच्या वतीने सुरू असलेल्या मोहिमेची माहिती दिली. यावेळी निलेश लंके यांनी पत्रकारांचे प्रश्न आपणाला जवळून माहित आहेत, आपल्या देशात पत्रकारांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे लोकसभेत प्रकारांचे प्रश्नांना आपण प्रधान्य देऊ.प्रदेशाध्यक्ष वसंत राव मुंडे राज्य संघटक संजय भोकरे यांनी बेळगाव दिल्ली गुजरात महाराष्ट्र गोवा राज्यात पत्रकारांचे चांगले संघटन केले असून पत्रकारांच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे योगदान आहे. वसंत मुंडे यांनी केलेली मागणी वृत्तपत्र सृष्टीला नवीन ऊर्जा देणारी आहे त्यामुळे केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर आपण या मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करून अशी ग्वाही त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडी सरकार येणार आहे आणि अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून आपला विजय निश्चित असल्याचा दावाही त्यांनी केला.यावेळी पत्रकार संघाचे डायरी, दिनदर्शिका व माहिती पुस्तिका देण्यात आली.यावेळी
दैनिक समर्थ गावकरीचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर यासह पत्रकार व संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी कराड (जि.सातारा)येथे पत्रकार संघाचे आरोग्य सेलचे प्रमुख आणि ह्यूमन जनर्ल चे मुख्य संपादक डॉ.अमितकुमार खाडे, यांच्या क्लिनिकला धावतीभेट दिली.त्यावेळी शहरातील पत्रकारांनी स्वागत करून संवाद साधला.यावेळी पत्रकार सुनील चव्हाण, सूर्यकांत पाटणकर,विलास कदम आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते. यावेळी डॉ.अमित खाडे यांना नुकतीच पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार ही करण्यात आला.
कोल्हापूर येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विभागीय कार्यालयास पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी शुक्रवार दि.१७ मे २०२४ रोजी भेट दिली.यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयस भगवान , कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाजीराव फराकटे, यांनी स्वागत केले.यावेळी करवीर तालुका संघटक तानाजी पोवार, उपाध्यक्ष विश्वनाथ मोरे, शहर सहसंघटक विनोद लोखंडे , राजेंद्र मकोटे , दयानंद लिपारे, आकाश कांबळे सह पत्रकार उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे राज्यातील अन्नदान सेवेतील उत्कृष्ट धार्मिक केंद्र : वसंतराव मुंडे
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यास हे राज्यातील अन्नदान सेवेतील उत्कृष्ट धार्मिक केंद्र असल्याचे मनोगत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी व्यक्त केले. ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता मंडळाचे विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,
यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत अक्कलकोट तालुकाध्यक्ष कमलाकर सोनकांबळे, सचिव विश्वनाथ चव्हाण, नंदकुमार जगदाळे, बसवराज बिराजदार, स्वामीराव गायकवाड, राजेश जगताप, दयानंद दणुरे, रमेश भंडारी, निंगप्पा निंबाळ समाधान अहिरे आदि पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, एस.के.स्वामी, बाळासाहेब घाडगे, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, कल्याण देशमुख, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, शावरेप्पा माणकोजी, शिवकुमार स्वामी, निखील पाटील, प्रविण घाडगे, विजय माने, चंद्रकांत हिबारे, काशिनाथ वाले, विश्वनाथ कलशेट्टी, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
शेतकर्यांबरोबर पत्रकारांच्याही प्रश्नांबाबत आवाज उठवू - बजरंग सोनवणे
पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाचे सोनवणे यांना निवेदन
बीड (प्रतिनिधी) मी सर्वसामान्य शेतकरीपुत्र म्हणून निवडणूकीत उभा आहे. वृत्तपत्रांच्या मागण्याबाबत पत्रकारसंघाने मला निवेदन दिले हेच माझ्यासाठी मोलाचे असून मला जनतेच्या आशिर्वादाने संसदेत जाण्याची संधी मिळाल्यास वृत्तपत्रांच्या मागण्यांबाबत नक्कीच पाठपुरावा करेल अशी ग्वाही बीड लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी दिली. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकार शिष्टमंडळासह सोनवणे यांची भेट घेवून केंद्र सरकारकडील वृत्तपत्रांच्या मागणीबाबत निवेदन देवून चर्चा केली.
बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व पदाधिकार्यांनी भेट घेवून केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणार्यांना उत्पन्न करात वार्षिक पाच हजार रूपयाची सुट द्यावी या मागणीसाठी पाठींबा देवून संसदेत गेल्यास पाठपुरावा करावा असे निवेदन दिले. वृत्तपत्रांच्या समस्या समजून घेवून सोनवणे म्हणाले, मी शेतकरीपुत्र, सामान्य कुटूंबातील असून लोकसभेची निवडणूक लढवत आहे. पत्रकार संघाने मला निवेदन देवून मागण्यांबाबत चर्चा केली हेच माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. पत्रकारांनी मला आपल्या मागण्यांबाबत निवेदन दिल्यामुळे मला विजय निश्चित वाटतो अशी आशा व्यक्त करून संधी मिळाल्यास वृत्तपत्रांच्या मागण्यांबाबत संसदेत प्राधान्याने भूमिका मांडेल अशी ग्वाही दिली. यावेळी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, हिंदुस्थान टाईम्सचे वरिष्ट सहाय्यक संपादक सुरेंद्र गांगण, एबीपी माझाचे प्रतिनिधी गोविंद शेळके, टिव्ही नाईनचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आदि उपस्थित होते.
भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना पत्रकारसंघाचे निवेदन
केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणार्यांना करसवलत द्यावी
बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने राज्यातील सर्व पक्षाच्या उमेदवारांना निवेदन देवून केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणार्यांना वार्षिक आयकरात पाच हजार रूपयाची सुट द्यावी अशी मागणी लावून धरली आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना भेटून संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, संतोष मानुरकर, वैभव स्वामी यांनी निवेदन देवून समर्थन देण्याची विनंती केली. पंकजा मुंडे यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. राज्यभरात जवळपास शंभर उमेदवारांना संघाच्या पदाधिकार्यांनी निवेदन देवून लक्ष वेधले आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची भेट घेवून पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकार संघाची भूमिका आणि केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणार्यांना आयकरात वार्षिक पाच हजार रूपयाची सुट द्यावी या मागणीबाबत चर्चा केली. लोकसभेत निवडून गेल्यानंतर आपण याविषयावर संसदेत पाठींबा द्यावा अशी विनंती केली. कोरोनानंतर अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांच्या समस्या समजून घेत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी पत्रकार संघाचे संतोष मानुरकर, विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी उपस्थित होते. राज्यभरात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांनी शंभर उमेदवारांना निवेदन देवून वृत्तपत्रांच्या मागणीकडे आणि समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांनी आपल्या मागणीसाठी लोकसभेच्या निवडणूकीत उभे असलेल्या सर्व पक्षीय उमेदवारांना निवेदन देवून मागणी लावून धरली आहे. याचा भविष्यात सकारात्मक परिणाम होईल आणि पत्रकारांच्या प्रश्नांकडे निवडून आलेल्या खासदारांचे लक्ष जाईल अशी आशा प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
पत्रकार संघाच्या मागणीला वंचित न्याय देणार-अॅड.बाळासाहेब आंबेडकर
बीड (प्रतिनिधी) कोरोनानंतर प्रिंटमिडीया निश्चितच आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला आहे. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला भक्कम आधार देणे हि सरकारची नैतिक जबाबदारी आहे. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी शासनाच्या तिजोरीवर भार न पडता उत्पन्न करातून वार्षिक पाच हजार रूपये सुट वृत्तपत्र खरेदीवर देण्याची मागणी रास्त केली आहे. या मागणीला न्याय मिळेपर्यंत वंचित खंबीरपणे साथ देईल असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा तथा अकोला लोकसभेचे उमेदवार अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केला.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे वंचितच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड.बाळासाहेब आंबेडकर आले असता त्यांची पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या सुचनेवरून मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी भेट घेवून पत्रकार संघाच्या मागणीसंदर्भात निवेदन देवून सविस्तर विवंचन केले. यावर त्यांनी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी प्रिंटमिडीयाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अतिशय चांगला पर्याय सरकारपुढे मांडला आहे. सरकार विविध जनहितकारी उपक्रमामध्ये उत्पन्न करातून सवलत देते. मिडीया देखील लोकशाही टिकवण्यामध्ये देशाच्या प्रगतीमध्ये सामाजिक योगदान म्हणून काम पाहते. आज मिडीयामुळेच लोकशाही आणि संविधान सक्षम आहे. तेव्हा अडचणीत सापडलेल्या मिडीयाला बाहेर काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी निश्चितच भविष्यात समर्थ साथ देईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पत्रकार संघाच्यावतीने वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे यांना देखील निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार बालाजी जगतकर यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाजीराव फरकाटे व पांडुरंग फिरंगे यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी चे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वृत्तपत्र खरेदी करणाऱ्यांना उत्पन्न करात वार्षिक पाच हजार रुपयाची सूट द्यावी या मागणीचे निवेदन देण्यात दिले.
यावेळी महाराजांनी, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि लोकसभेत पत्रकारांशी संबंधित प्राधान्याने प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.
लोकसभा अध्यक्षांना विनंती करून मुद्रित माध्यमाच्या प्रश्नांवर विशेष चर्चा घडवून आणायला सांगेन : खा. इम्तियाज जलील
प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिली ग्वाही
छत्रपती संभाजीनगर : मी अनेक वर्षे पत्रकारिता केल्यामुळे मला वृत्तपत्र सृष्टीच्या आिण पत्रकारांच्या अडचणी माहिती आहेत. कोरोनानंतर मुद्रित माध्यमाची झालेली बिकट अवस्था निश्चितच चिंताजनक असून त्यावर मार्ग काढण्यासाठी वसंत मुंडे यांनी जो पर्याय सुचविला आहे, तो रास्त आहेे. मी स्वत: पत्रकार असल्यामुळे संसदेत हा मुद्दा लावून धरेल, महाराष्ट्रच नाहीतर हा प्रश्न संपूर्ण देशासाठी महत्वाचा आहे. पुन्हा संसदेत जाण्याची आपण संधी दिली तर लोकसभा अध्यक्षांना विनंती करून या प्रश्नावर विशेष चर्चा घडवून आणायला सांगीन, अशी ग्वाही खा. इम्तियाज जलील यांनी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने वृत्तपत्रांना ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे वृत्तपत्र खरेदी करणाऱ्यांना उत्पन्न करात वार्षिक 5 हजार रुपये सूट द्यावी, ही मागणी लावून धरली आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे एमआयएमचे उमेदवार खा. इम्तियाज जलील यांची भेट घेऊन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गुरुवार, दि. 25 एप्रिल रोजी निवेदन दिले. यावेळी खा. इम्तियाज जलील यांनी पत्रकार संघाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे एमआयएमचे उमेदवार खा. इम्तियाज जलील यांची भेट घेऊन चर्चा केली. कोरोना वैश्विक महामारीनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वृत्तपत्र व्यवसायावर मोठा परिणाम झाला. वृत्तपत्रांचा खप आणि जाहिरातींचे प्रमाणही कमी झाले आहे. परिणामी वृत्तपत्र व्यवसायावर अवलंबून असलेले पत्रकार आणि इतर कर्मचाऱ्यांसमोर रोजगाराचाच प्रश्न निर्माण झाला आहे. देशभरात छोट्या-मोठ्या वृत्तपत्रांचा 35 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. यासाठी केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणाऱ्या आयकरदात्यांना उत्पन्न करात वार्षिक 5 हजार रुपयांची सूट द्यावी, अशी मागणी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली. या मागणीला छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे एमआयएमचे उमेदवार खा. इम्तियाज जलील यांनी पाठिंबा देत या निवडणुकीत आपला विजय झाल्यास लोकसभेत हा विषय प्राधान्याने मांडला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी लोकप्रभाचे संपादक संतोष मानूरकर, संपादक शारेक नक्षबंदी, पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभू गोरे, प्रसिद्धी प्रमुख संदीप घंटे, सचिन उबाळे यांच्यासह पत्रकारांची उपस्थित होती.
पत्रकार संघाची मागणी इतर राज्यातील पत्रकारही लावून धरतील अमर उजालाचे निवासी संपादक विजयकुमार गुप्ता यांचे मत
बीड (प्रतिनिधी) केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणार्यांना आयकरात वार्षिक पाच हजार रूपयाची सुट द्यावी ही मागणी देशभरातील वृत्तपत्रांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करणारी आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे मागणी झाली असून ती पूर्णत्वाकडे नेण्यासाठी लोकसभा निवडणूकीतील उमेदवारांना निवेदन दिल्याने याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे दिल्लीसह इतर राज्यातील वृत्तपत्र आणि पत्रकार संघटनाही ही मागणी लावून धरतील त्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही राष्ट्रीय दैनिक अमर उजालाचे निवासी संपादक विजयकुमार गुप्ता यांनी दिली.
बीड लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचे वार्तांकन करण्यासाठी राष्ट्रीय दैनिक अमर उजालाचे निवासी संपादक विजयकुमार गुप्ता आले होते. त्यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची भेट घेवून पत्रकार संघाने उमेदवारांकडे केलेल्या मागणींबाबत चर्चा केली. कोरोनानंतर अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना केंद्र सरकारने मदत करावी यासाठी पत्रकार संघाने अर्थमंत्र्यांकडे वृत्तपत्र खरेदी करणार्यांना वार्षिक पाच हजार रूपयाची सुट द्यावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी लोकसभा निवडणूकीतील सर्व पक्षीय शंभर उमेदवारांना या मागणीला पाठींबा मिळावा आणि संसदेत पाठपुरावा व्हावा यासाठी निवेदन देण्याची मोहिम चालवली आहे. देशात पहिल्यांदाच अशा पध्दतीने वृत्तपत्रांसाठी मागणी झाली असून मागणी पुर्णत्वाकडे जावी यासाठी निवडणूकीच्या मैदानातील उमेदवारांना निवेदन देवून पाठींबा मिळवण्याचा प्रकारही पहिल्यांदाच आपण ऐकतो आहे. पत्रकार संघाचे हे काम वृत्तपत्रांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. त्यामुळे दिल्ली आणि उत्तर भारतातील वृत्तपत्र आणि पत्रकार संघटनाही या मागणीला पाठींबा देतील यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली. लवकरच दिल्ली येथे या मागणीबाबत संघटनांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे यावेळी वसंत मुंडे यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडिया
5 days ago
This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.2 weeks ago
This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.3 weeks ago
This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.3 weeks ago
This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.3 weeks ago
This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.5 days ago
This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.2 weeks ago
This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.3 weeks ago
This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.3 weeks ago
This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.3 weeks ago
This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.














































































































































