राजकीय महानायक……!

विधानसभा निवडणुकीत युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असताना मित्र पक्षाने दगा दिला. राजकीय परिस्थिती कोणत्याच बाजुंनी अनुकूल राहिली नाही. अशावेळी कोणीही खचून जाणे स्वाभाविक, पण तसे घडले नाही. भाजपचे देवेंद्र फडणवीस जोमाने उभे राहिले. एकशे पाच आमदार घेऊन विरोधी बाकावरुन विरोधी पक्षनेता कसा असतो? हे दाखवून दिले. सत्ता गेली म्हणून दुसणे देण्यापेक्षा महाराष्ट्र पिंजून काढला आणि संधी मिळताच सत्तांतर घडवून दगा देणार्‍या मित्राचा कल्पने बाहेरचा हिशोब चुकता केला. पारंपारीक विरोधक राष्ट्रवादीचाही एक गट बरोबर घेऊन लोकसभेची वाट सुकर केली. राजकीय चमत्कारामुळे गोंधळलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महाभारतात कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णानेही धर्म रक्षणासाठी अधर्म केला नव्हता तर ती कुटनिती होती याचा दाखला देत राजकारणात टिकून राहण्यासाठी काही तात्कालीक तडजोडी कराव्या लागतात हे पटवून दिले. तेंव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय चातुर्याची आणि क्षमतेची प्रचिती पुन्हा एकदा दिसुन आली.
महाराष्ट्राचं राजकारण वर्षभरातील राजकीय घडामोडींनी ढवळून निघाल्याने सर्वसामान्यांसह राजकीय अभ्यासक, तज्ज्ञ आणि पत्रकारांची आवडती ‘सूत्रे’ यांनाही धक्का देणारे ठरले. राजकीय उलथापालथीत अनेक नावे येतात कालांतराने कमी होतात. मात्र एक नाव ध्रुवासारखं अढळ राहिले असुन या नावाशिवाय महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण होऊ शकणार नाही इतका दबदबा फडणवीस यांनी निर्माण करुन टिकवून ठेवला आहे.
साडेतीन वर्षात झाले इतके राजकीय बॉम्बस्फोट यापूर्वी कधीच झाले नाही. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीला बरोबर घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर एका उद्योगपतीच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली मोटारगाडी सापडल्याची घटना घडली आणि मार्च 2021 च्या विधीमंडळ अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सर्व कुंडली बाहेर काढले आणि सरकार गर्भगळीत झाले. तेंव्हाच विरोधी पक्षनेता काय असतो याची झलक दिसली आणि एकटे देवेंद्र काय करणार? असे कुत्सित भावनेने बोलणार्‍यांचीच पाचावर धारण झाली. राज्यसभेच्या निवडणुकीत तर संख्याबळ नसताना भाजपचा तिसरा उमेदवार विजयी केला आणि विधान परिषदेच्या निवडणुकीतही राजकीय चमत्कार दाखवला तेंव्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना काही काळ नेमके काय झाले आहे? हेच कळाले नाही. सत्ताधारी पक्षाचा चक्रव्यूह अचूक भेदण्याच्या फडणवीस यांच्या कर्तबागारीला शरद पवार यांनीही जाहीरपणे दाद दिली होती. महाविकास आघाडी दोन्ही निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरण्याच्या पूर्वीच शिवसेनेचा एक गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटीला रवाना झाला आणि तीन पक्षाचे सरकार कोसळले. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करत पक्षाच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत सत्तेच्या राजकारणात ‘पुन्हा’आले. तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या गटालाही सत्तेत सहभागी करुन घेण्याची राजकीय खेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या चातुर्याने यशस्वी करुन दाखवली. महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी कधीही होऊ शकले नाही असे वर्षभरात दोन पक्षातील मोठ्या बंडामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय क्षमतांची इतिहासात नोंदच झाली आहे. पारंपारीक विरोधी गटाला सोबत घेतल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमधील उडालेला गोंधळ लक्षात घेऊन फडणवीस यांनी महाभारतात कुरुक्षेत्रावर कौरवांच्या बाजुचे कर्ण, दुर्योधन, जयद्रथ यांचा वध करताना श्रीकृष्णाने अधर्म केला नव्हता तर ती कुटनिती होती. धर्माच्या रक्षणासाठी काही वेळा काही निर्णय परिस्थितीनुसार घ्यावे लागतात. राजकारणात टिकून राहण्यासाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी काही राजकीय तडजोडी करुन आपले उद्दीष्ट गाठावे लागते हे पटवून देत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारण्यासाठी ऊर्जाच दिली. तेंव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या दुरदृष्टी आणि राजकीय क्षमतांची प्रचितीच आली. फडणवीस यांच्या नेतृत्व गुणांचा आवाका प्रचंड मोठा आहे. हे हेरुनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी 2014 मध्ये मंत्रीपदाचा कोणताही अनुभव नसताना वयाने एकदम तरुण असतानाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी फडणवीस यांच्यावर सोपवली. पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा विश्‍वास सार्थ ठरवत फडणवीस यांनी पाच वर्ष अतिशय समर्थपणे आणि कोणत्याही आरोपाशिवाय निष्कलंकपणे आपला कार्यकाळ पूर्ण केला. दिवंगत वसंतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्री पदाची पाच वर्षाची कारकीर्द पूर्ण करणारे ते एकमेव ठरले. पाच वर्ष स्थिर सरकार आणि मुख्यमंत्री पाहण्यासाठी महाराष्ट्राला चार दशकांची प्रतिक्षा करावी लागली. वर्षानुवर्ष विरोधी बाकावर राहणारे, सत्ताधार्‍यांना जेरीस असणारे, सत्ताधारी म्हणून यशस्वी होत नाहीत या समाजालाही फडणवीस यांनी छेद दिला. अत्यंत तरुण वयात प्रगत राज्याच्या मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर ते गडबडले नाहीत. किंवा जबाबदारीचे ओझे असल्यासारखे कधी दिसले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कारभार हाकताना कायम �राजीनामे खिशात असल्याची भाषा करणार्‍या मित्र पक्षाला� सोबत घेत त्यांनी विकासाला गती दिली. नैसर्गिक संकटाचा सामना करताना जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या आव्हानांना सामोरे जाताना फडणवीस यांच्या नेतृत्व गुणाचा कस लागला. वेगवेगळ्या समाजघटकांचे आंदोलने यातून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर झाला. या सर्व आव्हानांना जीवाभावाच्या सहकार्‍यांच्या साथीने यशस्वीपणे सामोरे गेले. नागपूर महापालिकेच्या सदस्यत्वापासून अवघ्या एकविसाव्या वर्षी सुरू झालेला फडणवीस यांचा राजकीय प्रवास आणि त्यांनी गाठलेलं यश मिळवलेला विश्‍वास हा एखाद्या पटकथे सारखाच आहे. महापौर झाल्यानंतर पक्ष संघटनेत विविध पदावर काम करत त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्य पिंजून काढले. समवयस्क नव्या कार्यकर्त्यांची राज्यभर नाळ जोडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहून त्यांनी मिळवलेले यश अनेकांसाठी प्रेरणादायीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या �सबका साथ, सबका विकास� या मार्गावरून वाटचाल करताना फडणवीस यांनी सहकार्‍यांचा सल्ला घेऊन, मित्रपक्षाला चुचकारून आणि प्रसंगी विरोधकांना विश्‍वासात घेऊन विकासाचा अजेंडा पुढे नेला. सरकारचा कारभार पारदर्शक, सर्वसमावेशक असावा. हे सूत्र त्यांनी मुख्यमंत्री असताना कायम पाळले. जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड या दोन कामांबद्दल ते मराठवाड्याच्या सदैव लक्षात राहतील. ग्रामीण भागाच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवताना त्यांनी शहरी भागाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्याचे अनेक उदाहरणे देता येतील. संधी मिळाल्याशिवाय तरुणांना आपले गुण दाखविता येत नाही, याची जाणीव असल्यानेच त्यांनी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामुळे होतकरू व नवोन्मेषी तरुणांना फायदा झाला. त्यांना प्रशासनात काम करण्याचा थेट अनुभव मिळाला. पुणे मेट्रो व समृद्धी महामार्ग या कामांना समन्वयातून गती दिली. नागपूर येथे उभारलेले जागतिक दर्जाचे कॅन्सर हॉस्पीटल रुग्णांच्या आशेचे किरण बनले. शेतकरी कर्जमुक्ती, थेट जनतेतून नगराध्यक्ष, सरपंच संकल्पना ही नव्या नेतृत्वाची पेरणीच आहे.
शेतकर्‍यांचे आंदोलन व मराठा क्रांती मोर्चा हे संवेदनाशील विषय फडणवीस यांनी अत्यंत आपुलकीने हाताळले. राजकारणापेक्षा माणूस मोठा, ही त्यांची भावना या दोन्ही आंदोलनांच्या वेळी विशेषत्वाने जाणवली. फडणवीस यांच्या कामावर सामान्य जनता खूश असल्याचे 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालातून स्पष्ट दिसले. परंतु राजकीय उलथापालथीने फडणवीस यांना विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. याच काळात कोरोना महामारीचे संकट आले. राज्यकर्ते घराबाहेर पडत नसताना फडणवीस यांनी राज्य पिंजून काढले. सर्वसामान्य माणसांच्या अडचणी समजून घेत त्या दूर करण्यासाठी अहोरात्र झटले हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी विधानसभेची अधिवेशने गाजवली. संसदीय आयुधांचा वापर कधी, कसा आणि किती नेमकेपणाने करायचा याचा वस्तुपाठच फडणवीस यांनी घालून दिला. फडणवीस यांची कामगिरी विरोधी पक्षनेता की मुख्यमंत्री म्हणून श्रेष्ठ? असा प्रश्‍न पडतो. विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यांच्यातील आक्रमकता, प्रश्‍न धसाला लावण्याची वृत्ती प्रकर्षाने दिसली. तर मुख्यमंत्री म्हणून अतिशय संयमाने, सर्वसमावेशक काम जाणवले. राजकीय कुरुक्षेत्रावर चक्रव्यूहात शिरण्याचे धाडस अनेक जण करतात. पण चक्रव्यूह भेदण्याची कर्तबगारी दाखविणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे थोडेच असतात. गृहमंत्री म्हणून अनेकदा संवेदनशिल विषय हाताळताना नेतृत्वाचा कस लागतो. ती प्रगल्भता फडणवीस यांच्या ठायी अनेकदा दिसुन आली. आश्‍वासनांची पूर्तता करणारे आणि शब्दाला जागणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. कोणालाही त्यांच्याशी संपर्क करणे सहज शक्य असते, ही त्यांची खुबी अनेक राजकीय नेत्यांना थक्क करणारी आहे. घरातून राजकीय बाळकडू मिळाले असले तरी त्यांनी इतर राजकीय नेत्यांप्रमाणे साखर कारखाने, शिक्षण संस्था काढण्यात वेळ घातला नाही तर पक्षाला मजबूत करण्यासाठी समर्पित भावनेने काम केल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही पक्ष मजबूत झाला आहे तो त्यांच्या नेतृत्वामुळेच. राजकीय सत्तांतरात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करुन स्वतः उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी मनाची उदारता दाखवली. तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री करत अर्थ खाते देऊन बरोबर येणार्‍या नेत्याला सन्मान देण्याचा मोठेपणाही त्यांनी दाखवला. त्यामुळे राजकीय पटलावर इतरांना सन्मान आणि मोठेपण देणारा जनतेच्या मनावर अधिराज्य करतो. त्यामुळेच फडणवीस यांना राजकारणातील महानायक समजले जात आहे. अशा सर्वव्यापी, धुरंधर नेतृत्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा….!

  • वसंत मुंडे, लोकसत्ता
    प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई.
Tags: No tags

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *